सुशांत प्रकरण सीबीआयकडे

7 months ago 615

सुशांत प्रकरण सीबीआयकडे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवान घडामोडी घडत आहेत. सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना तीन दिवसात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याशिवाय कोर्टाने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणाच्या तपासाचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बिहारच्या आयपीएस अधिकार्‍यांना चौकशीपासून रोखणे चांगले संकेत नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारला सुनावले.

रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा खटला मुंबईत हस्तांतरीत करावा, अशी मागणी रिया चक्रवर्तीची आहे. याबाबत बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही सरकारांना आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. बुधवारी सुप्रीम कोर्टाने सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्या. आता या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या आयपीएस अधिकार्‍यांना चौकशीपासून रोखणे चांगले संकेत नसल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकारला सुनावले. कोण कशी चौकशी करत आहे माहीत नाही; पण महाराष्ट्र सरकारने चौकशीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे मत कोर्टाने मांडले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार सरकारचा सीबीआय चौकशीचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला आहे. केंद्र सरकार लवकरच सीबीआय चौकशीचे आदेश देऊ शकते, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ते तुषार मेहता यांनी दिली. यामुळे रिया चक्रवर्ती यांच्या केसच्या बदलीचा प्रश्नच येत नाही. यामुळे या याचिकावर सुनावणी करण्याची गरज नाही, असे मेहता यांनी कोर्टात नमूद केले. महाराष्ट्र पोलीस सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचे पुरावे नष्ट करत आहे, असा आरोप सुशांत सिंहचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.

कारस्थान करणार्‍यांना मोठी किंमत मोजावी लागले -राऊत
आदित्य ठाकरे यांच्याविरोधात दळभद्री राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ आहेत. हे सरकार अस्थिर करू शकले नाहीत या वैफल्यातूनच आदित्य ठाकरेंवर हे आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरेंना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ठाकरे कुटुंबातील ते एक महत्त्वाचा घटक आहेत. ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून होणार नाही. ज्यांना कारस्थान करायचंय ते करूद्यात. हे कारस्थान फक्त एका युवा मंत्र्याविरुद्ध नाही किंवा ठाकरे कुटुंबाविरोधात नाही ते महाराष्ट्राविरोधात केले जात आहे. या कारस्थानामागचा खरा सुत्रधार कोण, हे आम्हाला माहिती आहे. कारस्थान करणार्‍यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा सूचक इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

Read Entire Article