परिस्थितीवर मात करत झाला तलाठी, समाजऋण फेडण्यासाठी 10 गावांमध्ये सुरू करतोय अभ्यासिका

1 week ago 1
talathi राजेश देशमाने

ध्येयवेडी माणसं समाजात बदल घडवत असतात, समाजासाठी जगत असतात. लग्नावर उथळ खर्च करण्याची फॅशन असतांना हातनी येथील गजानन जाधव यांनी स्वतःचा विवाह विधायक कार्य करून संपन्न करायचं ठरवलं आहे. विवाहानिमित चिखली तालुक्यातील 10 गावामध्ये स्वखर्चातून अभ्यासिका उभारण्याचे काम त्यांनी हातात घेतले आहे.

एप्रिल 2016 मध्ये तलाठी या पदावर रुजू झालेले गजानन जाधव संध्या संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे कार्यरत आहेत. सामान्य आर्थिक परिस्थिती असणार्‍या गजानन याचे पितृछत्र लहान असतांना हरवले. गजानन, तीन बहिणी आणि आई असा हा परिवार, त्याच्या आईने शेती आणि मजुरी करून सर्वांना शिक्षण दिले. तिन्ही मुलींचे लग्नही केले.

गजानन यांनीही शिक्षण घेत असताना चिखली येथील एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानावर काम केले. डीएड नंतर बीए चे शिक्षण आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी असा प्रवास करणार्‍या गजानन यांच्या संघर्षाला 2016 साली यश आले. एप्रिल 2016 ला ते तलाठी झाले. 2016 पासून तर आतापर्यंत महिन्याच्या पगारातील 50 टक्के खर्च ते गरीब मुलांच्या शिक्षणासाठी करतात. मार्च 2018 मध्ये त्यांच्या बहिणीच्या लग्नानिमित्त 1 लाख रुपयांची पुस्तके त्यांनी कोलारा येथील अभ्यासिकेला आंदण स्वरूपात दिली. यासोबतच गोद्री आणि भोकर येथील अभ्यासिकेला सुद्धा पुस्तके दिली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मला ज्या समस्येला तोंड द्यावे लागले त्या समस्या ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी कामगारांच्या मुलांवर येऊ नये यासाठी आता गाव तिथे अभ्यासिका हा उपक्रम हाती घेतल्याचे ते सांगतात. खेडेगावातील प्रत्येक मुलाला अभ्यास करण्यासाठी योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विवाह प्रसंगी होणारा अनाठायी खर्च टाळून दहा गावामध्ये अभ्यासिका तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यापैकी दिवठाणा, बोरगाव वसू, सवना, सोनेवाडी आणि शेलुद येथील अभ्यासिकांचे कामही पूर्ण झाले आहे. 28 फेब्रुवारीला गजानन जाधव यांचा विवाह कोलारा येथे संपन्न होणार आहे.

Read Entire Article