
परळी तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला असून रामेवाडी येथील पाचशे कोंबड्या नष्ट केल्या आहेत. जिल्हाधिकारी जगताप यांनी 3 गावांत संक्रमित क्षेत्र तर 13 गावांत खबरदारीचा उपाय म्हणून सतर्क क्षेत्र घोषित केले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूची लागण वाढत आहे.
या रोगापासून परळी तालुका अद्याप दूर होता. परंतु रामेवाडी येथील तुकाराम कुकडे यांच्या शेडमधील काही कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. तेव्हा त्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे आढळले.
त्यानंतर जिल्हाधिकारी आर.एस.जगताप यांनी रामेवाडीपासून एक किलोमीटर परिसरातील रामेवाडी तांडा, जळगव्हाण शिवारात प्राण्यातील संक्रमण व नैसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत संक्रमित क्षेत्र घोषित केले. तर पोहनेर, डिग्रस, रामनगर तांडा, हिवरा, गोवर्धन, हिवरा वस्ती, पिंपरी, तेलसमुख, बोरखेड, ममदापूर, कौडगाव हुडा, कौडगाव हुडा तांडा व माजलगाव तालुक्यातील कोथाळा आदी गावांना सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केले. या गावातील कुकुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा, प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील कुक्कुटपालक तुकाराम कुकडे यांच्याकडे असलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने त्यांच्याकडील 500 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. परळी तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण सुरू झाल्याने कुक्कुटपालकांवर संकट आले आहे.