इंफन्ट इंडियाच्या ‘त्या’ जोडप्यांचा आगळावेगळा विवाहसोहळा संपन्न!

1 week ago 1
img-20210223-wa0010

एचआयव्ही बाधित परिवारातील अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड तालुक्यातील पाली येथील आनंदग्राम येथे संपन्न झाला. यावेळी कोणत्याही धार्मिक पद्धतीचा वापर न करता नवरा-नवरींनी एकेमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन केले व विवाह संपन्न झाला! आपल्या आयुष्यात अनेक विवाहसोहळे आपण पाहिले, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले, परंतु या अनोख्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले हे माझं भाग्यच असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील इंफन्ट इंडिया (आनंदग्राम) या एचआयव्ही ग्रस्त मुलांच्या संगोपन केंद्रास राष्ट्रीय महामार्गापासून जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून 50 लाख रुपये मंजूर केले असून, पावसाळा सुरू होण्याच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

या संस्थेचे संचालक दत्ता बारगजे व संध्याताई बारगजे यांनी दिवंगत डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून एचआयव्ही बाधितांची सेवा करण्याचे, त्यांना सक्षम करून समाजात सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करण्याचे सेवाव्रत हाती घेतले आहे, हे अत्यंत महान कार्य असून, आनंदग्राम ही संस्था आजपर्यंतच्या शासकांकडून दुर्लक्षित राहणे हे अनाकलनीय व दुर्दैवी असल्याचेही मुंडे म्हणाले.

दरम्यान एचआयव्ही बाधित दाम्पत्याची पण पूर्णपणे सक्षम असलेल्या शिवकन्या या चिमुकलीचा पहिला वाढदिवस धनंजय मुंडे यांच्या हस्ते तिला केक भरवून करण्यात आला. या बालकांचे समाजातील स्थान अबाधित राहावे यासाठी काम करत असलेल्या आनंदग्राम संस्थेला शासकीय स्तरावर तर मदत करण्यात येईलच परंतु माझ्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी दरवर्षी या संस्थेला 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी जाहीर केले.

धनंजय मुंडेंना स्व.गोपीनाथराव मुंडेंचा परिसस्पर्श – दत्ता बारगजे

दरम्यान आनंदग्रामच्या कामाच्या माध्यमातून मी व माझी पत्नी राज्यभर देणगी गोळा करण्यासाठी फिरलो, तेव्हा सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांनी मला धनंजय मुंडे यांना भेटण्याचा सल्ला दिला. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात दातृत्वाचा गुण खूप मोठा असून त्यांना दिवंगत गोपीनाथराव मुंडे या लोकनेत्याच्या परिसस्पर्श झालेला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष दत्ता बारगजे यांनी म्हटले आहे.

संस्थेची स्मरणिका व माहितीपुस्तक देऊन बारगजे दाम्पत्याने मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी परळी न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बीड जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, सूर्यभान मुंडे, निलेश लोहिया, अविनाश नाईकवाडे, प्रा.निलेश आघाव, शिवलिंग मोराळे यांसह आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने विवाह सोहळा व संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कोविड विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले दिसून आले.

Read Entire Article